गंगापूर - मालुंजा शिवना नदीवरील पूल अत्यंत धोकादायक

Foto
▶ गंगापूर - लासूर स्टेशन पुलावर नेहमी होते वाहतुकीची प्रचंड कोंडी

▶ संरक्षक कठडे गायब; नवीन, मजबूत, रुंद पूल उभारण्याची मागणी

अलिम चाऊस

गंगापूर, मालुंजा शिवना नदीवरील गंगापूर ते लासूर स्टेशन रस्त्यावरील पूल सध्या अत्यंत धोकादायक ठरत असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पुलावर संरक्षक
कठडे पूर्णपणे गायब असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल गंगापूर, लासूर स्टेशन, कन्नड, चाळीसगाव धुलिया, तसेच ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून जड वाहने, शालेय बस, दुचाकी व शेतमाल वाहतूक मोठ्या प्रमाणात याच मार्गावरून होत असते. मात्र पूल अरुंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक ठप्प होते.

पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास परिस्थिती आणखी गंभीर बनते. स्थानिक नागरिकांनी
अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लक्ष घालून काम सुरू करावे या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून जुना पूल पाडून तातडीने नवीन, मजबूत व रुंद पूल उभारावा, तसेच तोपर्यंत संरक्षक कठडे व आवश्यक सुरक्षा उपाय तात्काळ करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गंगापूर ते लासुर स्टेशन येथे दररोज या पुलावरून येजा करावी लागते. कठडे नसल्यामुळे लहान मुले व महिलांना प्रचंड भीती वाटते. एखादी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का? सकाळ, संध्याकाळ येथे तासन्‌तास वाहतूक कोंडी होते. पूल अरुंद असून मोठी वाहने आली की, दुचाकी चालकांना भीती वाटत आहे.
- सिकंदर पैलवान, माजी सरपंच, घोडेगाव

हा पूल अत्यंत जुना व मोडकळीस आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून नवीन पूल मंजूर करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
- भाऊसाहेब शेळके, शेतकरी नेते